दत्ताची आरती

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
दत्त आरती 
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४॥
 
__________________________________________________________________________

कृष्णापंचगंगासंगम निजस्थान ।
चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमना ।
तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण ।
विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥ १ ॥
जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता ।
नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥
वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान ।
मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥
वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन ।
अंत्यवक्रें वदवी निगमागम पूर्ण ॥ जय. ॥ २ ॥
शुक्लाकाष्टीं पल्लव दावुनि लवलाही ।
कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही ॥
अभिनव महिमा त्याचा वर्णूं मी कायी ।
म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायीं ॥ जय देव. ॥ ३ ॥
दिपवाळींचे दिवशीं भक्त येउनि ।
आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणीं ॥
आठहि ग्रामीं भिक्षा केली तद्दीनीं ।
निमिषमात्रे तुंतक नेला शिवस्थानीं ॥ जय. ॥ ४ ॥
ऎसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले ।
भक्तवत्सल ऎसे ब्रीद मिरविलें ॥
अगाध महिमा म्हणउनि वेदश्रुति बोले ।
गंगाधरतनय सदा वंदी पाउलें ॥ ५ ॥
 
__________________________________________________________________________
 करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥
श्रीपदकमला लाजविती ।
वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥
कटिस्थित कौपिन ती वरती ।
छोटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥
वर्णूं काय तिची लीला ।
हीच प्रसवली, मिष्टान्न बहु, तुष्टचि झाले,
ब्रह्मक्षेत्र आणि वैष्य शुद्रही सेवुनियां जीची ॥
अभिरूची सेवुनियां ॥ १ ॥
गुरुवर सुंदर जगजेठी ।
ज्याचें ब्रह्मांडे पोटीं ।
माळा सुविलंबित कंठी ।
बिंबफळ रम्य वर्णूं ओष्ठी ॥ चाल ॥
अहा ती कुंदरदनशोभा ।
दंडकमंडलू, शंखचक्र करिं, गदापद्म धरि,
जटामुकुट परि, शोभतसे ज्याची ॥
मनोहर शोभतसे. ॥ २ ॥
रुचिरा सौम्य युग्मह्रष्टी ।
जिनें द्विज तारियला कुष्टी ॥
दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी ।
केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल. ॥
दयाळा किती म्हणूनि वर्णू ।
वंध्या वृंदा, तिची सुश्रद्धा, पाडुनि बिबुधची,
पुत्ररत्न जिस देउनिया सतिची ॥
इच्छा पुरविली मनिंची ॥ ३ ॥
देवा अघटित तव लीला ॥
रजकही चक्रवर्ती केला ॥
दावुन विश्वरुप मुनिला ।
द्विजादरशूल पळें हरिंला ॥ चाल. ॥
दुभविला वांझ महिषी एक ।
निमिषामाजी, श्रीशैल्याला तंतुक नेला,
पतिताकरवी, वेद वदविला, महिमा अशी ज्याची ॥
स्मराही महिमा. ॥ ४ ॥
ओळखुनि क्षुद्रभाव चित्ती ।
दिधलें पीक अमित शेती ॥
भूसर एक शुष्क वृत्ती ॥
क्षणार्धे धनद तया करिती ॥ चाल. ॥
ज्याची अतुल असे करणी ।
नयन झांकुनी, सर्वे उघडितां नेला काशिस,
भक्त पाहातां वार्ता अशि ज्याची ॥
स्मरा हो वार्ता अशि ज्याची ॥ ५ ॥
दयाकुल औदुंबरि मुर्ती ।
नमितां होय शांतवृत्ती ॥
न देती जननमरण पुढती ।
सत्य हे न धर मनि भ्रांति ॥ चाल ॥
सनातन सर्वसाक्षी ऎसा ।
दुस्तर हा भव, निस्तरावया, जाउनि स्त्वर,
आम्ही सविस्तर, पूजा करुं त्याची ॥
चला हो पूजा करुं त्याची ॥ ६ ॥
तल्लिन होउनि गुरुचरणीं ।
जोडुनि भक्तराजपाणी ॥
मागे हेंचि जनकजननी ।
अंती ठाव देऊ चरणीं ॥ चाल. ॥
नको मज दुजे आणिक कांही ।
भक्तवत्सला, दीनदयाळा, परम कृपाळा, दास नित्य याची ॥
उपेक्षा करूं नको साची ॥ ७ ॥
__________________________________________________________________________

करुणात्रिपदी - ॥१॥

शांत हो श्रीगुरूदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ ध्रु. ॥
तू केवळ माताजनिता । सर्वथा तू हितकर्ता ।
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ।
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥

अपराधास्तव गुरूनाथा । जरि दंडा घरिसी यथार्था ।
तरी आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करू धावा? ।
सोडविता दुसरा तेंव्हा । कोण दत्ता आम्हा त्राता? ॥ २ ॥

तू नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि । असे मानुनि नच हो कोपी ।
निज कृपालेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥

तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दुजा त्राता ।।
निज बिरुदा आणुनि चित्ता । तू पतीतपावन दत्ता ।
वळे आता आम्हांवरता । करुणाघन तू गुरूदत्ता ॥ ४ ॥

सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार ।
तव पदीं अर्पू असार । संसाराहित हा भार ।
परिहारिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबंधो ।
आम्हा अघलेश न बाधो । वासुदेवप्रार्थित दत्ता ॥ ५ ॥

करुणात्रिपदी - ॥२॥

श्री गुरुदत्ता जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।
चोरे द्विजासी मारिता मन जे कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥१॥
पोटशुळाने द्विज तडफडता कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥२॥
द्विजसुत मरतां वळले ते मन हो की उदासीन न वळे आतां । श्री गुरुदत्ता ॥३॥
सतिपति मरतां काकुळती येतां वळले ते मन न वळे की आतां । श्री गुरुदत्ता ॥४॥
श्री गुरुदत्ता त्यजि निष्ठुरता कोमलचित्ता वळवी आतां । श्री गुरुदत्ता ॥५॥
जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता । 

करुणात्रिपदी - ॥३॥

जय करुणाघन निज जनजीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन । जय करुणाघन ।
निज अपराधे उफराटी दृष्टि होऊनि पोटी भय धरु पावन । जय करुणाघन ॥१॥
तूं करुणाकर कधी आम्हांवर रुससि न किंकर वरद कृपाघन । जय करुणाघन ॥२॥
वारी अपराध तूं मायबाप तव मनी कोप लेश न वामन । जय करुणाघन ॥३॥
बालकापराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन । जय करुणाघन ॥४॥
प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देव अत्रिनंदन । जय करुणघन ॥५॥
निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन । जय करुणाघन ।

 _____________________________________________________________________
दत्ता मज़ला प्रसन्न होशी जरी तू वर देशी, तरी मी आन न मागे तुज़सी निर्धारुनी मनसी ||

स्मरण तुझे मज़ नित्यासावे भावे तव गुण गावे, अनासक्ति ने मी वागावे ऐसे मन वळवावे | १ |
दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वर देशी, तरी मी आन न मागे निर्धारुनी मनसी |

सर्व इन्द्रिये आणि मन हे तुझे हाती आहे, यास्तव आता तू लावलाहे स्वपदी मन रमवावे | २ |
दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वर देशी, तरी मी आन न मागे निर्धारुनी मनसी |

विवेक आणि सत्संगति हे नेत्रद्वय बा आहे, वासुदेव निर्मल देहे जेणे त्वत्पदी राहे | ३ |
दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वर देशी, तरी मी आन न मागे निर्धारुनी मनसी |
__________________________________________________________________________
 पंचपदी
परमहंस परिव्रजकाचार्य श्रीमत्‌ वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मगावी (श्रीक्षेत्र माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) पुढीलप्रमाणे पंचपदी म्हणतात.

पद १

उध्दरिं गुरुराया । अनसूया तनया दत्तात्रेया ॥ धृ. ॥

जो अनसूयेच्या भावाला भुलुनियां तत्सुत झाला ।
दत्तात्रेय अशा नामाला मिरवीवंद्य सुराला ।
तो तूं मुनिवर्या निजपाया, स्मरता वारिसी माया ॥ १ ॥

जो माहूर पुरी शयन करी ।
सह्याद्रीचे शिखरी निवसें गंगेचे स्नान करी , भिक्षा कोल्हापूरी ।
स्मरता दर्शन दे वारि भया तो तू आगमगेया ॥ २ ॥

तो तूं वांझेसी, सुत देसी, सौभाग्या वाढविसी ।
मरता प्रेतासी जीवविसी, सद्वरदाना देसी ।
यास्तव वासुदेव तव पाया, धरी त्या तारीं सदया ॥ ३ ॥

पद २

शांत हो श्रीगुरूदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ ध्रु. ॥

तू केवळ माताजनिता । सर्वथा तू हितकर्ता ।
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ।
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥

अपराधास्तव गुरूनाथा । जरि दंडा घरिसी यथार्था ।
तरी आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करू धावा? ।
सोडविता दुसरा तेंव्हा । कोण दत्ता आम्हा त्राता? ॥ २ ॥

तू नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि । असे मानुनि नच हो कोपी ।
निज कृपालेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥

तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दुजा त्राता ।।
निज बिरुदा आणुनि चित्ता । तू पतीतपावन दत्ता ।
वळे आता आम्हांवरता । करुणाघन तू गुरूदत्ता ॥ ४ ॥

सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार ।
तव पदीं अर्पू असार । संसाराहित हा भार ।
परिहारिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबंधो ।
आम्हा अघलेश न बाधो । वासुदेवप्रार्थित दत्ता ॥ ५ ॥

पद ३

श्री गुरु दत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता ll ध्रु ll
चोरे द्विजासी मरिता मन हे कळवळले ते कळवलो आता ll १ ll
पोटशूलाने द्विज तडफडता कळवळले ते कळवलो आता ll २ ll
द्विजसुत मरता वळले ते मन हो की उदासीन न वले आता ll ३ ll
सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन न वले की आता ll ४ ll
श्री गुरु दत्ता त्याजी निष्ठुरता कोमल चित्ता वळवी आता ll ५ ll
पद ४

जय करूणाघन निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन ll ध्रु ll
निज अपराधे उफराटी दृष्टी, होऊनी पोटी भय धरू पावन ll १ ll
तू करूणाकर कधी आम्हावर रूससी न किंकर-वरदकृपघन ll २ ll
वारी अपराध तू माय-बाप, तव मनी कोप लेश न वामन ll ३ ll
बालकापराधा गने जरी माता, तरी कोण त्राता देईल जीवन ll ४ ll
प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव, पदी दे वो ठाव देव अत्रिनंदन ll ५ ll

पद ५

आठविं चित्ता तूं गुरुदत्ता । जो भवसागर पतितां त्रातां ॥
आहे जयाचें कोमल हृदय । सदयिचा हा भव हरि वरदाता ॥ १ ॥
पाप पदोपदिं होई जरी तरी । स्मरतां तारीं भाविकपाता ॥ २ ॥
संकट येतां जो निज अंतरी । चित्ती तया शिरी कर धरीं त्राता ॥ ३ ॥
जो निज जिवींचे हितगूज साचें । ध्यान योगियायाचे तो हा ध्याता ॥ ४ ॥
सज्जनजीवन अनसुयानंदन । वासुदेव ध्यान हा यतिभर्ता ॥५॥
__________________________________________________________________________
क्रुपा हस्त स्तोत्रम
तपत्द्रयाने मम देह तापला।
विश्रान्ती कोणी नच देतसे मला।
दैवे तुझे पद लाधले मला।
दत्ता क्रुपासाऊली दे नमू तुला॥१॥
कामादि षड्वैरि सदैव पीडिती।
दुर्वासना अन्ग सदैव ताडिती।
त्राता दुजा कोणी न भेटला।
दत्ता क्रुपासाऊली दे नमू तुला॥२॥
देही अहन्ता जडली म मोडवे।
ग्रुहादीकस्त्रीममता न सोडवे।
त्रितापदानावळ पोळितो मला।
दत्ता क्रुपासाऊली दे नमू तुला॥३॥
अन्गी उठे हा अविचार दुर्धर।
तो आमुचे बुडवितसे घर।
पापे करोनि जळतो त्वरे मला।
दत्ता क्रुपासाऊली दे नमू तुला॥४॥
तूची क्रुपासागर मायबाप तू।
तू विश्वहेतु हरि पापताप तू।
न तुज वाचूनि दयाळू पाहिला।
दत्ता क्रुपासाऊली दे नमू तुला॥५॥
दारिद्र्यदावे द्विज पोळता तया।
श्री द्यावया तोडिशी वेल चिन्मया।
तयापरि पाहि दयार्द्र तु मला।
दत्ता क्रुपासाऊली दे नमू तुला॥६॥
प्रेतासि तु वाचविशी दयाघन।
काष्ठासि तू पल्लव आणिशी मन।
हे आठवी मी तरि जीव कोमला।
दत्ता क्रुपासाऊली दे नमू तुला॥७॥
ह्या अष्टके जी स्तविती तयावरी।
क्रुपा करी हात धरी तया शिरी।
साष्टान्ग घालू प्रणिपात बा तुला।
दत्ता क्रुपासाऊली दे नमू तुला॥८॥
इति श्री वासुदेवानन्द सरस्वती विरचित
क्रुपा हस्त स्तोत्रम सपूर्णम।
__________________________________________________________________________
विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले ।
अनुसयेचें सत्त्व पाहावया आले ॥
तेथें तीन बाळक करुनीं ठेवीले ।
दत्त दत्त ऎसे नाम पावले ॥ १ ॥
जय देव जय देव जय दत्तात्रेया ।
आरती ओवाळूं तुज देवत्रया ॥ धृ. ॥
त्रिदेवांच्या युवती परि मागों आल्या ।
त्यांसि म्हणे ओळखुनी न्या आपुल्या पतिला ॥
कोमल शब्दें करुनी करुणा भाकील्या ।
त्यांसी समजावीतां स्वस्थाना गेल्या ॥ जय. ॥ २ ॥
काशी स्नान करवीरक्षेत्रीं भोजन ।
मातापूरी शयन होते प्रतिदान ॥
ऎसें अघटित सिद्धमहिमान ।
दास म्हणे हें तों नव्हे सामान्य ॥ ३ ॥
________________________________________________________________________

आरती दत्तराजगुरुची ।
भवभयतारका स्वामीची ॥ धृ. ॥
दिगंबर, उग्र ज्याची मूर्ती ।
कटिवर छाटि रम्य दिसती ॥
चर्चुनि अंगिं सर्व विभुती ।
कमंडलु धरोनियां हाती ॥ चाल ॥
पृष्ठी लोळे जटेचा भार ।
औदुंबरतळी, कृष्णेजवळीं, प्रभातकाळीं, वर्णित भक्त कीर्ति ज्याची॥
दिगंतरी वाहे कीर्ति ज्याची ॥ आरती. ॥ १॥
अनुसयेच्या त्वां पोटी ।
जन्म घेतला जगजेठी ॥
दिव्य तव पादभक्तिसाठी ।
जाहली अमित शिष्यदाटी ॥ चाल ॥
राज्यपद दिधलें रजकाला ।
जो रत जाहला, त्वत्पदकमला,
किमपि न ढळला, पाहुनि पूर्ण भक्ति त्याची ॥
अंती दिली मुक्ती त्वांची ॥ आरती. ॥ २ ॥
सती तव प्रताप ऎकोनी ।
आली पतिशव घेवोनी ॥
जाहली रत ती तव चरणी ।
क्षणभंगुर भव मानोनी ॥ चाल ॥
तिजला धर्म त्वांचि कथिला ।
जी सहगमनीं, जातां आणुनी,
तीर्थ शिंपुनी, काया सजिव केलि पतिची ॥
आवड तुज बहु भक्तांची ॥ आरती. ॥ ३ ॥
ऎसा अगाध तव महिमा ।
नाही वर्णाया सीमा ॥
धनाढ्य केला द्विजोत्तमा ।
दरिद्र हरुनी पुरुषोत्तमा ॥ चाल ।
नेला तंतुक शिवस्थानी ।
वांझ महिपिसी, दुग्ध दोहविसी,
प्रेत उठविसी काया बहुत कुष्ठि ज्याची ॥
केली पवित्र ते साची ॥ आरती. ॥ ४ ॥
ठेवुनि मस्तक तव चरणी ।
जोडुनि दामोदर पाणी ॥
ऎसी अघटित तव करणी ।
वर्णू न शके मम वाणी ॥ चाल ॥
अहा हें दिनानाथ स्वामिन् ।
धाव दयाळा, पूर्ण कृपाळा, श्रीपद्मकमळा परिसुनि विनंती दासाची ॥
भक्ती दे त्वत्पदकमलाची ॥ आरती. ॥ ५ ॥
_____________________________________________________________________
स्वामी नरसिंहसरस्वती । जय गुरुमूर्ती ।
जय यतिवर्या जय मंगल ॥ धृ ॥
कमितकामफलश्रुति जय मंगल ।
निरुपम नित्य निरामय जय मंगल ॥
निर्वाण भक्त यतिराया जय मंगल ॥ स्वामी ॥ १ ॥
भक्तजनवर कल्पवृक्षा जय मंगल ।
भक्तेंदुदयकरणदक्षा जय मंगल ॥
भीमागंधर्वगुरु वेषा जय मंगल ॥ स्वामी ॥ २ ॥
____________________________________________________________________ 
जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा ।
तन मन अर्पूनि प्रेमानंदे करितों आजी सुखसदना ॥ धृ. ॥
अधम पातकि सत्य मी जनीं ।
क्षणिक सौख्य तें, नित्य मानूनी ॥
विषयीं गुंतलो मोहकाननी ।
मुक्त करि प्रभॊ, सदय होउनी ॥ बाळकृष्ण विठ्ठल दीना ।
सुखकर होई भवहरणा ॥ १ ॥
______________________________________________________________________
धन्य हे प्रदक्षीणा सदगुरूरायाची ।
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥
गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी।
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥
पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।
सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥
मृदंगताघोषी भक्त भावार्थे गाती ॥
नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती ॥ धन्य. ॥ ३ ॥
कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां ॥ मोक्ष लागे पायांता ॥ धन्य ॥ ४ ॥
प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला ।
श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ ५ ॥
_______________________________________________________________________